महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी मान्य
पर्यावरण विभागाला सादरीकरण करण्याचे आदेश
नागपूर,
Cleaning and revitalization of Koradi Lake कोराडी येथील ५५० एकर क्षेत्रावर कोराडी तलावाच्या स्वच्छता आणि पुनर्जीवनासाठीची कृती योजना तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या मागणीनंतर पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात तातडीने पावले उचलत सकारात्मक निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील दालनात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार बर्वे, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तलावाचे पाणी कमालीचे दूषित
कोराडी येथील सुमारे ५५० एकरचा हा विस्तीर्ण तलाव गेल्या काही काळापासून गंभीर प्रदूषणाचा सामना करत आहे. परिसरातील चार नगरपालिका आणि काही गावांमधील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी कमालीचे दूषित झाले होते. या दूषित पाण्यामुळे स्थानिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. याबाबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत पर्यावरण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
एसटीपी यंत्रणा झाली जुनी
तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र, ही एसटीपी यंत्रणा आता जुनी झाली असून ती निकामी ठरत आहे. त्यामुळे तलावात दूषित पाणी मिसळतच आहे. ही बैठक आयोजित करुन त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली.
कायमस्वरूपी उपाययोजना करणार
Cleaning and revitalization of Koradi Lake पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेताना नगरपालिका आणि गावांमधून येणारे दूषित पाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील असे स्पष्ट केले. तर या प्रस्तावावर पर्यावरण विभागाने पुढील आठ दिवसांत करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. कोराडी तलावाचे प्रदूषण रोखणे आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सरकारची प्राथमिकता आहे.