एटापल्ली,
CPI and Villagers Demand Action तालुक्यातील हेटलकसा गाव परिसरातील पहाडी जंगल भागात अवैधरित्या खदान सुरू करण्यासाठी सर्व्हे, ड्रिलिंग, वृक्षतोड व माती खोदकाम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे (भाकपा) धाव घेतली असून प्रशासनाकडे तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
भाकपाच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार एटापल्ली यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर भाग हा पेसा कायद्यांतर्गत आदिवासीबहुल क्षेत्र असून गावकर्यांची कोणतीही परवानगी न घेता हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जल, जंगल व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा बेकायदेशीर वापर होत असून कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.
स्थानिक आदिवासी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने काम सुरू करण्यात आले असून संबंधित विभागांची अधिकृत मान्यता नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून आदिवासींच्या पारंपरिक हक्कांवर गदा येत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी भाकपाकडे मदत मागितली असून पक्षाच्या नेतृत्वाखाली अवैध खदान कामाला तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. भाकपाने प्रशासनाकडे तत्काळ शासकीय पथक पाठवून चौकशी करण्याची, अवैध सर्व्हे व खनन कामे थांबवण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भाकपाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार, सदस्य सुरज जक्कुलवार, तालुका सहसचिव रितेश जॉई तसेच हेटलकसा ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.