नवी दिल्ली,
Cyber Attack on CBSE Portal केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान सायबर सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असतानाच पोर्टलवर सायबर हल्ल्यांचे अनेक प्रयत्न झाल्याची माहिती मंडळाने दिली आहे. मात्र, या सर्व प्रयत्नांना यशस्वीपणे परतवून लावत विद्यार्थ्यांची सेवा अखंडित ठेवण्यात आल्याचा दावा बोर्डाने केला आहे.पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी पोर्टलचा वापर केला. एका वेळी हजारो वापरकर्त्यांना हाताळण्याची क्षमता असलेल्या या प्रणालीवर मोठा ताण असतानाही अर्ज प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. मंगळवारपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या अर्ज दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याच काळात काही अज्ञात घटकांकडून पोर्टलची कार्यक्षमता बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पावधीतच पोर्टलवर लाखो डिजिटल विनंत्या (हिट्स) नोंदवल्या गेल्या. तसेच, संवेदनशील फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी एक लाखांहून अधिक प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आले. मात्र, अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीमुळे या प्रयत्नांना यश आले नाही.सीबीएसईच्या सायबर सुरक्षा आणि तांत्रिक पथकाने तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पोर्टल सुरक्षित ठेवले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तज्ज्ञांची टीम चोवीस तास प्रणालीवर लक्ष ठेवून असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सूचनांचा विचार करून पोर्टलमध्ये काही महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः अर्ज भरण्यासाठी उपलब्ध वेळ वाढवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रक्रिया अधिक सोप्या पद्धतीने पूर्ण करता येत आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्यातील अडचणीही कमी झाल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांच्या माहितीची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली असून पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडत असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. सायबर हल्ल्यांचे प्रयत्न वाढत असले तरी विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना सातत्याने राबविली जात असल्याचा विश्वासही मंडळाने व्यक्त केला आहे.