इंदूर,
Death of a Young Cricketer from Maharashtra पर्यटनासाठी लेह-लडाखकडे निघालेल्या चार मित्रांचा प्रवास भीषण अपघाताने संपुष्टात आला असून महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात अनिकेत काळे यांच्यासह त्यांचे मित्र बद्रीनाथ नांगरे यांचाही जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत काळे, बद्रीनाथ नांगरे, ओंकार साबणे आणि भूषण हे चार मित्र रविवारी रात्री जीपने लेह-लडाखच्या दिशेने प्रवासासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास सेंधवा टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाची समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की जीपचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.

अपघातानंतर चारही जण वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, टोल नाका कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जखमी ओंकार साबणे आणि भूषण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.अनिकेत काळे हे टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमधील ओळखीचे नाव होते. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनामुळे क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय तातडीने मध्य प्रदेशकडे रवाना झाले. सोमवारी सायंकाळी अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.