ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर खडाजंगी!

लेबनॉन हल्ल्यांवरून वाद

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Dispute between Trump and Netanyahu मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील दूरध्वनी संभाषणाची चर्चा रंगली आहे. लेबनॉनवर इस्रायलकडून सुरू असलेल्या लष्करी कारवायांबाबत ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेतान्याहूंना कठोर शब्दांत सुनावल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकन माध्यमांतील सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इस्रायलच्या आक्रमक भूमिकेवर आक्षेप घेत नेतान्याहूंना परिस्थिती अधिक चिघळवू नये, असा इशारा दिला. या संभाषणादरम्यान त्यांनी इस्रायली नेतृत्वावर कृतघ्नतेचाही आरोप केल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
 
 
 
Trump and Netanyahu
दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये बेरूतवर कोणताही मोठा हल्ला होणार नसल्याचा दावा केला. इस्रायली सैन्याला मागे बोलावण्यात आल्याचे तसेच हिजबुल्लाहशी झालेल्या चर्चांमधून दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.या घडामोडींमुळे इराणनेही कठोर भूमिका घेतली आहे. लेबनॉनमधील परिस्थिती आणि शस्त्रसंधीचे कथित उल्लंघन यामुळे अमेरिकेसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चांमध्ये सहभागी होण्यास इराणने तात्पुरता विराम दिल्याचे वृत्त आहे. मध्यस्थांमार्फत सुरू असलेला संवाद आणि संदेशांची देवाणघेवाणही स्थगित करण्यात आल्याचे इराणी वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाचे पडसाद आता राजनैतिक चर्चांवरही उमटताना दिसत असून, इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे अमेरिका, इराण आणि इतर प्रादेशिक शक्तींमधील संबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.