मुंबई,
Do not rush the sowing यंदाच्या खरीप हंगामावर अल-निनोच्या प्रभावाची शक्यता व्यक्त होत असल्याने राज्यातील पावसाचे स्वरूप कमी आणि असमान राहू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ मान्सूनपूर्व सरींवर आधारित पेरणीची घाई करू नये, असे महत्त्वाचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार, खरीप पिकांच्या योग्य वाढीसाठी सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाऊस आवश्यक आहे. फक्त पहिल्या पावसावर अवलंबून राहून पेरणी केल्यास नंतर पावसाचा खंड पडल्यास बियाणे खराब होण्याचा आणि मोठ्या नुकसानीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जमिनीत किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाचा अंदाज, मातीतील ओलावा आणि हवामान खात्याचे अपडेट यांचा विचार करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. घाईघाईत केलेल्या पेरणीमुळे दुबार पेरणीची वेळ येऊन उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.सोयाबीनसारख्या प्रमुख पिकांसाठी बियाण्यांचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांनी अनावश्यक खर्च टाळण्यावर भर द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासून, योग्य बीजप्रक्रिया करून त्यांचा वापर केल्यास खर्चात बचत होऊ शकते तसेच रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होऊ शकतो.
कृषी विभागाने सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा-सरी (BBF) पद्धत आणि बेडवर टोकन पद्धतीने पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य निचरा होतो, बियाण्याची बचत होते आणि पिकांची वाढ सुधारते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असते.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी शेतकऱ्यांना हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल आणि उत्पादनात वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अल-निनोच्या शक्यतेमुळे यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब हाच यशाचा मार्ग ठरेल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.