वेदांता समूहावर ईडीचे छापे

फेमा उल्लंघन प्रकरणात कारवाई

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
मुंबई,
ED Action Against Vedanta Group देशातील प्रमुख उद्योग समूहांपैकी एक असलेल्या वेदांता ग्रुपवर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत मुंबईसह विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत नियमभंग झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून तपास यंत्रणांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परकीय चलनाशी संबंधित व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय या कारवाईमागे आहे. परदेशात बेकायदेशीर पद्धतीने पैसे पाठवणे, गुंतवणुकीच्या नियमांचे पालन न करणे तसेच परदेशात मालमत्ता खरेदीसंदर्भातील संभाव्य अनियमितता याची तपासणी ईडीकडून केली जात आहे. फेमा कायद्याअंतर्गत अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर कडक नियंत्रण ठेवले जाते आणि उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे.
 
 
वेदांता
 
वेदांता समूह हा नैसर्गिक संसाधने, खाणकाम, धातू उत्पादन आणि ऊर्जा क्षेत्रातील एक मोठा बहुराष्ट्रीय उद्योग समूह आहे. 1976 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा व्यवसाय धातू, खनिज, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. जस्त आणि ॲल्युमिनियम उत्पादनात या समूहाचा देशात मोठा वाटा असून तेल उत्पादन क्षेत्रातही कंपनी सक्रिय आहे. कंपनीने भवष्यात भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे नियोजन केले असून काही वर्षांत सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या समूहाशी संबंधित कोणतीही तपासणी आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
याआधीही वेदांता समूह तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता. 2004 मध्ये परकीय चलन नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी तत्कालीन अंमलबजावणी संचालनालयाने स्टरलाइट इंडस्ट्रीज आणि तिच्या संबंधित कंपन्यांवर कारवाई केली होती. त्या वेळी कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सध्याच्या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून पुढील तपासात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.