नागपूर,
Food Donation to Gurukul Students अधिकमासानिमित्त दीनदयाल नगर परिसरातील ‘मुक्तागणं सख्या’ समूहाच्या वतीने गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व सत्काराचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले, तर उपस्थितांनाही एक वेगळा आध्यात्मिक अनुभव मिळाला. गीता आणि रंजना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या मुक्तागणं सख्यांनी अधिकमासाचे औचित्य साधत अन्नदानाचा संकल्प केला. दीनदयाल नगरातील कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या सुमारे २० विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गुरुकुलातील विद्यार्थी वेद, अथर्वशीर्ष, विष्णुसहस्रनाम, रुद्रपाठ, भगवद्गीता आदी धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करतात. भारतातील विविध राज्यांतून आलेले हे विद्यार्थी दहा ते पंधरा वयोगटातील असून पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धतीचे जतन करण्याचे कार्य करीत आहेत. रंजना यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे वडा-पूरणाचे भोजन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे पूजन करून त्यांना भेटवस्तूही प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमात रंजना यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशातील विद्यार्थ्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व, त्यांचे संस्कारयुक्त व मृदू बोलणे आणि धार्मिक वातावरण यामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सहवासात मन प्रसन्न झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला सुमारे ५० जणांची उपस्थिती होती. समाजासाठी छोटासा का होईना, पण सकारात्मक वाटा उचलल्याचे समाधान मुक्तागणं सख्या समूह आणि ढोले परिवाराने व्यक्त केले. अधिकमासात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
सौजन्य: कल्पना वाराणशीवार, संपर्क मित्र