उष्णतेची लाट ठरतेय ‘सायलेंट किलर’

तज्ज्ञांचा गंभीर इशारा

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Heatwave: The Silent Killer देशात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने अनेक भागांमध्ये ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेच्या झळा सहन करत आहेत. वाढती उष्णता आता केवळ हवामानाचा प्रश्न न राहता गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनत चालल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या अभ्यासानुसार, देशात केवळ एका दिवसाची तीव्र उष्णतेची लाटही हजारो अतिरिक्त मृत्यूंना कारणीभूत ठरू शकते. सलग पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहिल्यास मृतांचा आकडा तब्बल ३० हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असा धक्कादायक अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. भारतातील विविध शहरांवरील आधीच्या अभ्यासांचा एकत्रित आढावा घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 

The Silent Killer 
 
 
उघड्यावर काम करणाऱ्यांना धोका
भारताला उष्ण हवामानाची सवय असली तरी गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या झाल्या आहेत. २०२४ मध्ये राजस्थानमध्ये तापमानाने ५० अंशांपेक्षा अधिक पातळी गाठल्याची नोंद झाली होती, तर यंदाही देशातील अनेक भागांमध्ये विक्रमी उष्णता जाणवत आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये काँक्रीटच्या वाढत्या प्रमाणामुळे रात्रीचे तापमानही कमी होत नाही, ज्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.या उष्णतेचा सर्वाधिक फटका शेतकरी, बांधकाम मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार आणि वृद्ध नागरिकांना बसत आहे. दिवसभर उघड्यावर काम करणाऱ्या या घटकांकडे उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने धोका अधिक वाढतो आहे.
 
 
 
ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर
अभ्यासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की उष्णतेमुळे होणारे अनेक मृत्यू अधिकृत नोंदींमध्ये वेगळ्या कारणांनी दाखवले जातात, जसे की हृदयविकाराचा झटका किंवा श्वसनविकार. त्यामुळे प्रत्यक्षात उष्णतेमुळे किती मृत्यू होतात याचे अचूक चित्र समोर येत नाही.युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात देशातील १० शहरांच्या आकडेवारीवर आधारित विश्लेषण करण्यात आले असून ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर असू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.अभ्यासानुसार उत्तर प्रदेश सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे. येथे दीर्घकाळ उष्णतेची लाट राहिल्यास हजारो अतिरिक्त मृत्यू होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अहमदाबाद, जयपूर आणि सुरतसारख्या शहरांमध्ये एका दिवसातच शेकडो अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्यांमध्ये उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे, कारण अशा भागांमध्ये आरोग्य सेवा आणि आपत्कालीन यंत्रणा मर्यादित असतात. हवामान बदलामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून त्यासाठी पूर्वसूचना यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थेची तयारी मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली आहे.