वॉशिंग्टन,
Hinduphobia will not be tolerated अमेरिकेत हिंदू समाजाविरोधात घडणाऱ्या द्वेषपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी संसदेत एक महत्त्वपूर्ण ठराव चर्चेत आला आहे. हिंदू-अमेरिकन समुदायाच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या विरोधातील भेदभाव, कट्टरता आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांचा निषेध करणाऱ्या या ठरावाला अनेक खासदारांचा पाठिंबा मिळत आहे. हा ठराव भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी प्रतिनिधीगृहात मांडला होता. त्यानंतर भारतीय वंशाचेच खासदार रो खन्ना यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेच्या आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये हिंदू-अमेरिकन समाजाने दिलेल्या योगदानाची या ठरावात विशेष नोंद घेण्यात आली आहे.

जानेवारी २०२५ मध्ये प्रथम सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला आतापर्यंत ३२ खासदारांचे समर्थन मिळाले आहे. सह-प्रायोजकांमध्ये राजा कृष्णमूर्ती आणि सुहास सुब्रमण्यम यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश आहे. ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणत्याही धर्माविरोधातील द्वेष, भेदभाव किंवा हिंसाचाराला लोकशाही समाजात स्थान असू शकत नाही. हिंदू समाजाविरुद्ध वाढत्या पूर्वग्रहांबाबत चिंता व्यक्त करत अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे. हिंदू-अमेरिकन समुदायासाठी हा ठराव महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, तो केवळ त्यांच्या योगदानाचा सन्मान करत नाही, तर धार्मिक स्वातंत्र्य, समानता आणि परस्पर आदर या मूल्यांबाबत अमेरिकेची बांधिलकीही अधोरेखित करतो. अमेरिकन राजकारणात हिंदू समाजाच्या वाढत्या प्रभावाची आणि त्यांच्या योगदानाची ही आणखी एक महत्त्वाची दखल मानली जात आहे.