आंतरराज्यीय टोळीसह घरफोड्यांच्या आवळल्या मुसया

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
*१२ लाखांवर मुद्देमाल जप्त
*पत्रपरिषदेत अपर पोलिस अधीक्षकांची माहिती
 
वर्धा, 
Inter-state Burglary Gang रामनगर, सावंगी आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफा दुकान आणि घरफोडीच्या पाच घटनांचा छडा लावत पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीसह ५ जणांना अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. चोरट्यांकडून १२ लाखांवर ऐवज जप्त केला असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमाने यांनी मंगळवार २ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
japt dksl
 
संजय उदावंत यांचे भवानी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान असून २६ मे रोजी रात्री चोरट्यांनी दुकान फोडून ८ किलो चांदी आणि १.२८ लाखांचे सोन्याचे दागिने असा ८ लाख ३० हजारांचो ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथकं तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी बिहार येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने बिहार गाठले. मात्र, तीन आरोपी हे दोन दुचाकीने नागपूर येथे येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून साहील लांजेवार, अफरोज अन्सारी, संघर्ष बागडे आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख १३ हजार ९५० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात रवानगी केली असून अन्य आरोपींना ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व आरोपींवर नागपूर, भंडारा, कोंढाळी आणि मध्यप्रदेशातील सौन्सर येथे तब्बल ३३ गुन्हे दाखल असल्याची माहितीही वाघमारे यांनी दिली.
 
 
Inter-state Burglary Gang  यासोबतच सावंगी आणि शहर पोलिस ठाण्यांतर्गत घरफोडीतील पाच गुन्ह्यांची उकल करीत आरोपींकडून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली. या प्रकरणात एक आरोपी फरार असून एकावर अटकेची कारवाई सुरू आहे. घरफोडीच्या अनेक तक्रारी येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे प्राप्त करून आरोपींची झाडाझडती घेत असताना कुख्यात घरफोडी करणारा पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे, वर्धा याने त्याचा साथीदार यशवंत दांडेकर याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. दोघांचाही शोध सुरू असताना यशवंत दांडेकर हा हिंगणा येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पोचन्ना देऊळकर याच्यासोबत सावंगी हद्दीतील साईनगर, नंदनवननगर, गौरीनगर येथे तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साहु ले-आऊट, गणेशनगर येथे दोन महिन्यात घरफोड्या केल्याचे सांगितले. या चोरीचा माल अशोकनगर येथील रवींद्र लोंढे यांच्या मार्फतीने सराफा व्यावसायिक राजेंद्र उमाटे यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे पथकाने तात्काळ राजेंद्र उमाटे यांच्या रामकृष्ण ज्वेलर्स गाठून त्यांच्याकडून ३३.५ ग्रॅम सोने व ४० ग्रॅम चांदी असा ४ लाख ९० हजारांचा ऐवज हस्तगत करून यशवंत दांडेकर, पोचन्ना देऊळकर, रवींद्र लोंढे आणि राजेंद्र उमाटे यांच्यावर गुन्हे दाखल केले. पोचन्ना देऊळकर हा फरार आहे. राजेंद्र उमाटे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहितीही अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांनी यावेळी दिली. ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी आणि पथकाने केली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.