नागपूर,
Lal Singh Academy लाल सिंह स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ओपन इन्व्हिटेशनल स्केटिंग स्पर्धा नुकतीच हुडकेश्वर रोडवरील रोडकर लेआऊट, न्यू ओम नगर मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत नागपूर व परिसरातील सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेत लाल सिंह स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण २३ पदके पटकावली. यामध्ये ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये वियांश वाडीभस्मे, इशिता वाडीभस्मे, सुयश सोनुले, आस्था शेरेकर, अर्जुन संगपाल, कारुण्य हिरेकर आणि साईश कडू यांचा समावेश आहे. रौप्यपदक विजेते म्हणून पुनीत गांजरे, निहित सरोदे, वेद फंदी, रिचल वानखेडे, निहान वरघट आणि समर्थ आमटे यांनी यश संपादन केले. तर कियान बिरनवार, वियान बिरनवार, हार्दिक भानुसे, मॅक्स कुंभारे, अपर्णा कोठेकर, ओम वाकुळकर, राजवीर चुनारकर, त्रिशा रंगारी, शिवांक नानवटकर आणि भार्गव शापकर यांनी कांस्यपदके मिळविली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर लीला अजय हातीबेड, बेस स्कूलचे प्राचार्य गौरव माहुले, छत्रपती पुरस्कार विजेते जयंत जयप्रकाश दुबळे, महाराष्ट्र राज्याचे माजी सहसंचालक (क्रीडा) जयप्रकाश दुबळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक संभाजी भोसले तसेच नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या यशामागे अकादमीचे मुख्य प्रशिक्षक लाल सिंह आर. यादव आणि सहाय्यक प्रशिक्षक तारुण्य धांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम आणि योग्य प्रशिक्षणामुळे खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मिसाळ यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, खेळाडू आणि उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
सौजन्य: लालसिंग यादव, संपर्क मित्र