घोटनिंबाळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट अखेर जेरबंद

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
भद्रावती, 
Leopard Captured in Ghotnimbalkar भद्रावती वनपरिक्षेत्रातील घोटनिंबाळा, चालबर्डी, कचराळा, गोंड नुन्हारा, लोणारा पारखी तसेच आयुध निर्माणी चांदा परिसरातील इंद्रप्रस्थ गार्डनमागील रामटेके सोसायटी परिसरात गेल्या महिनाभरापासून दहशत निर्माण करणारा बिबट अखेर मंगळवार, 2 जून रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बिबट्याने मागील एक महिन्याच्या कालावधीत सुमारे 20 कालवडी, वासरे आणि इतर पाळीव जनावरे फस्त केली होती. त्यामुळे घोटनिंबाळा, लोणारा पारखी, चालबर्डी, कचराळा, देऊळवाडा आणि रामटेके सोसायटी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याचा वाढता वावर आणि जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांची गंभीर दखल घेत वनविभागाने घोटनिंबाळा परिसरात पिंजरा लावला होता. 
 
 
leperd 
 
 
अखेर मंगळवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास बिबट पिंजर्‍यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट अंदाजे चार ते साडेचार वर्षांचा नर असल्याचे वन अधिकार्‍यांनी सांगितले. बिबट जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक तरसे यांच्या नेतृत्वात भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, देवगडे, पवन मांढरे, प्रफुल मांढरे, राजू कुळमेथे, शैलेश कुळसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी केली. सध्या या बिबट्याला आयुध निर्माणी चांदा परिसरातील वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये निरीक्षण व विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार त्याला पुढील काही दिवसांत जंगलातील निर्जन आणि सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.