सुसुंद्रा येथे दोन पिलांसह बिबट्याचा मुक्तसंचार

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
६ गावांना सतर्कतेचा इशारा
आष्टी (श.), 
Leopard Roaming Freely नजीकच्या सुसुंद्रा परिसरात सध्या २ पिलांसह बिबटचा मुक्तसंचार सुरू आहे. एका विहिरीत बिबटचे दोन पिल्लं आढळल्याने आणि बिबट सुरक्षित ठिकाण शोधत असल्याने सुसुंद्रासह परिसरातील सहा गावांना वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवू नये म्हणून ट्रॅप कॅमेरांच्या माध्यमातून बिबटच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
 
 
b itya
 
Leopard Roaming Freely तळेगाव (श्या. पंत.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या सुसुंद्रा शेतशिवारातील कॅनल शेजारील विहिरीत १ रोजी काही नागरिकांना बिबट्याची दोन पिलं आढळून आली. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. माहिती मिळताच तळेगावचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारले यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. संबंधित विहिरीची पाहणी केली असता त्यात आडवा मोठा खड्डा असल्याचे आणि तो खड्डा भू-पृष्ठापर्यंत असल्याचे पुढे आले. याच खड्ड्यातून प्रवेश करीत पिलांना सुरक्षित ठिकाणी सोडून बिबट शिकारीसाठी गेली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सुरूवातीला लावला. परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून बिबटच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. अशातच रात्रीला उशीरा बिबटने येथे येत आपल्या पिलांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशने धूम ठोकल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी सुसुंद्रा परिसरात सध्या २ पिलांसह मादी बिबटचा मुक्तसंचार असल्याने सुसुंद्रा, माणिकवाडा, तारासावंगा, पारडी, मोई, मुबारकपूर, बेलगाव, सावरडोह या गावांना वनविभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.