6 जूनपर्यंत धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास बेमुदत उपोषण

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
सिरोंचा, 
Paddy Procurement Centers सिरोंचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी उन्हाळी धानाची कापणी व मळणीची कामे पूर्ण केली असतानाही शासकीय धान खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्यावतीने सोमवारी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. 6 जूनपर्यंत खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास 8 जूनपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी या निवेदनातून दिला आहे.
 
 
nivedan
 
सिरोंचा तालुका हा शेतीप्रधान असून येथील बहुतांश नागरिकांचे जीवनमान धान शेतीवर अवलंबून आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी मोठा खर्च व मेहनत घेऊन धानाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, शासनाकडून धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात विलंब होत असल्याने शेतकर्‍यांना आपला माल विक्री करता येत नाही. परिणामी अनेक शेतकर्‍यांवर आर्थिक कोंडी निर्माण झाली असून पुढील हंगामाची तयारी, कर्जफेड व दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. तसेच घरामध्ये अथवा उघड्यावर साठवून ठेवलेल्या धानाला कीड लागण्याची तसेच अवकाळी पावसामुळे धान खराब होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व मंजूर धान खरेदी केंद्रे सुरू करून शेतकर्‍यांना हमीभावाने धान विक्रीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
 
Paddy Procurement Centers  6 जूनपर्यंत सिरोंचा तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास 8 जूनपासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या सहभागातून बेमुदत साखळी उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना राम रंगूवार, तिरुपती मुद्दाम, रंगूवार आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या या मागणीमुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि धान खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत कितपत तत्परता दाखवते, याकडे संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे लक्ष लागले आहे.