हरित वर्धेसाठी वृक्षारोपण व रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कृती आराखडा

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
४५०० रोपं लावण्यावर शिकामोर्तब
 
वर्धा, 
Rainwater Harvesting वर्धा शहराला हरित बनवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पावसाळ्यात वृक्षारोपण व रेन वॉटर हार्वेटिंग या विषयावर कृती आराखडा तयार करण्यासाठी विविध सामाजिक संघटनेद्वारे नियोजन बैठकीचे आयोजन मंगळवार २ रोजी नगर परिषदेत करण्यात आले होते. यावेळी शहरात ४,५०० रोपं लावण्याच्या निर्णयावर शिकामोर्तब झाला. बैठकीला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुरलीधर बेलखोडे, डॉ. सचिन पावडे, डॉ. राजेश आसमवार, श्याम भेंडे, मिलिंद मशानकर, आलोक बेले, मुकुंद देशपांडे, आदी उपस्थित होते.
 
 
Rainwater Harvesting
 
पावसाळा सुरू होताच शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला दुतर्फा, नगर परिषद तसेच सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, स्मशानभूमी, नागरी वसाहती परिसरात चिंच, आवळा, जांभूळ, वड, कडुनिंब, करंज, बकुळ, बहावा, गुलमोहर, कपिंपळ, बेल, शेवगा, मेडशिंग, पांढरा कुडा, पळस, आदी तसेच रस्त्याच्या बाजूला पांढरा कांचन, कुंती, बॉटल ब्रश, टेकोमा, चाफा, जरुल या वृक्षांबद्दल चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल विकसित करण्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. येथील वातावरणात टिकून राहणार्‍या प्रजातींच्या झाडांची निवड करण्यात आली. लावलेल्या प्रत्येक झाडाला पाणी आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थेच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांवर सोपवली जाणार आहे. लोकसहभाग आणि जनजागृती करून स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांचा सहभाग तसेच स्थानिक प्रभाग समिती गठीत करून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. एक कुटुंब, एक झाड या संकल्पने अंतर्गत नागरिकांना नपच्या रोपवाटिका, सामाजिक वनिकारण, वनविभागद्वारे मोफत रोपांचे वाटप करण्यावर भर दिला जाईल. वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यासाठी घंटागाडीद्वारे प्रचार प्रसार करण्याविषयी चर्चा करण्यात आली. पावसाळ्याची चाहूल आणि पर्यावरण दिनाचा संदेश या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे ५ जूनपासून मोठ्या प्रमाणावर लागवड मोहीम हाती घेतल्या जातात. त्यानिमित्ताने ऑसिजन पार्क व शहरातील विविध ठिकाणापासून सुरूवात हरित क्रांती मंचद्वारे करण्यात येणार आहे.
 
 
रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम
Rainwater Harvesting  जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम जलयोद्धा मित्र परिवाराकडून रबविण्यावर भर देण्यात येणार आहे. वॉटर हार्वेस्टिंग मोहिमेद्वारे इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे संकलित करणे. भूजल पुनर्भरण गोळा केलेले पाणी विहिरी, कूपनलिका किंवा पुनर्भरण खड्ड्यांमध्ये सोडणे, सार्वजनिक जनजागृतीद्वारे पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यावर भर दिल्या जाणार आहे.