पुणे,
Rohit Outraged Over Onion Protest राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “ही दोन्ही गट म्हणजे दात नसलेले वाघ असून ते फक्त गुरगुरतात,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असताना रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या मते, हे गट भाजपपासून दूर जाण्याची हिंमत दाखवणार नाहीत आणि केवळ सत्तेभोवतीच त्यांची भूमिका केंद्रित आहे.

रोहित पवार यांनी आरोप केला की, अजित पवार गट आणि शिंदे गट यांची राजकीय अस्वस्थता ही जनतेसाठी नसून सत्तेसाठी आहे. याउलट, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे अस्वस्थ आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या तयारीदरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, नाफेडमार्फत थेट शेतकऱ्यांकडून खरेदी व्हावी आणि किमान 24 ते 25 रुपये दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने कांदा खरेदी करून नाफेडला विकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.नाफेडच्या खरेदी प्रक्रियेबाबत अद्याप स्पष्ट अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून चर्चा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कांदा प्रश्न आणि वाढते राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण तापले असून पुढील काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.