कोलकाता,
Samik Bhattacharya's Warning पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे मोठी खळबळ उडाली असताना, भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नव्याने नियुक्त झालेले पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसमधील असंतुष्ट किंवा बंडखोर आमदारांना पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे ठामपणे जाहीर केले आहे. भाजपची वाटचाल स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर होणार असून पक्षाचे "तृणमूलीकरण" कधीही होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सामिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, मागील निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळवला तो बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे. त्यामुळे भ्रष्टाचार किंवा वादग्रस्त प्रतिमा असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेने अनेक ठिकाणी तृणमूलच्या कारभाराविरोधात मतदान केले असून भाजप आता तळागाळात संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. पक्ष नेतृत्वाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेक आमदार अनुपस्थित राहिल्याने पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. काही आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप होत असून, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अलीकडेच पक्षाने दोन आमदारांना निलंबित केल्यानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. याच काळात काही आमदारांच्या बैठका, गुप्त चर्चा आणि स्वतंत्र गटबांधणीच्या हालचालींमुळे तृणमूलमध्ये फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, पक्षाच्या विधिमंडळ नेतृत्व निवडीसंदर्भात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरील काही स्वाक्षऱ्यांबाबत वाद निर्माण झाला आहे. काही आमदारांनी संबंधित स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा दावा केल्याने तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे तृणमूलच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.राज्यातील या घडामोडींमुळे बंगालचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात तृणमूलमधील अंतर्गत संघर्ष आणि भाजपची आक्रमक भूमिका यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.