भांडेवाडी प्रकरणावरून बजरंग दल-विहिंप आक्रमक

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
नागपूर,
The Bhandewadi Controversy नागपूरच्या भांडेवाडी परिसरात गोवंशाचे अवशेष आढळल्याच्या घटनेनंतर शहरातील वातावरण पुन्हा तापले असून या प्रकरणावरून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घटनेच्या निषेधार्थ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नागपूर महानगरपालिकेत धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.या आंदोलनादरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौर तसेच पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. भांडेवाडी परिसरातील कथित प्रकारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच गोवंश संरक्षणाच्या प्रश्नावर प्रशासनाने गंभीर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
 
 

The Bhandewadi Controversy 
यावेळी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अन्य प्रकरणाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. गोवंश वाहतुकीशी संबंधित कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या जनावरांच्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास झाला नसल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली.बजरंग दलाचे पदाधिकारी अमोल ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासनावर तीव्र टीका केली. भांडेवाडी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ४ जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे भांडेवाडी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.