भोपाळ,
The Twisha Death Case मध्य प्रदेशातील अभिनेत्री आणि मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ट्विशाची सासू गिरीबाला सिंग आणि पती समर्थ सिंग यांना विशेष न्यायालयाने १६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या पाच दिवसांच्या चौकशीनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासातील गंभीर बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तपासादरम्यान सीबीआयने भोपाळमधील निवासस्थानी घटनास्थळाची पुनर्रचना केली. यासाठी विशेष डमीचा वापर करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आढळल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

विशेषतः ट्विशाच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत आणि तिच्या शरीरावरील जखमांबाबत विचारलेल्या प्रश्नांना आरोपींकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे समोर आले. गिरीबाला सिंग यांनी आपल्या बाजूने स्पष्टीकरण देताना ट्विशासोबतचे संबंध चांगले असल्याचा दावा केला. आंतरजातीय विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला होता तसेच लग्नानंतर आर्थिक मदतही केल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, समर्थ सिंगने घटनेच्या दिवशी सर्व काही सुरळीत असल्याचे सांगत अचानक परिस्थिती बदलल्याचा दावा केला.
मात्र, घटनेनंतरच्या हालचाली, जवळची रुग्णालये टाळून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा निर्णय आणि मृत्यूपूर्वीच्या जखमांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आरोपींकडून मिळाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास अधिक सखोल करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.फॉरेन्सिक आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण अंतिम टप्प्यात असून, त्याच्या आधारे पुढील अहवाल तयार केला जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार गिरीबाला सिंग आणि समर्थ सिंग यांना पुढील सुनावणीपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. या बहुचर्चित प्रकरणातील प्रत्येक घडामोडीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.