मुंबई,
Theft at Raveena Tandon's House बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरात नियमित वावर असलेल्या एका महिलेनेच लाखो रुपयांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.ही घटना रवीना टंडन यांच्या आईच्या घरात घडल्याचे समोर आले आहे. घरातील मौल्यवान दागिने आणि काही महागड्या वस्तू अचानक गायब झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर संशय निर्माण झाला. सुरुवातीला नेमकी चोरी कशी झाली याबाबत गोंधळ होता, मात्र घरातील एका महिलेच्या हालचालींवर संशय वाढल्यानंतर प्रकरणाला कलाटणी मिळाली.

राशी छाबडिया असे अटक करण्यात आलेल्या 47 वर्षीय महिलेचे नाव असून ती मागील काही वर्षांपासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती. विशेषतः रवीना टंडन यांच्या आईची देखभाल करण्यासाठी ती नियमितपणे घरी येत असल्याने कुटुंबाचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात घरातील तिजोरीत ठेवलेले सोने, हिऱ्यांचे दागिने तसेच दोन महागडी घड्याळे चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि पुराव्यांच्या आधारे संशयित महिलेला ताब्यात घेत अटक केली.
तपासादरम्यान काही चोरीची घड्याळे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, मात्र दागिन्यांचा मोठा भाग अद्याप सापडलेला नाही. या चोरीमध्ये इतर कोणी सहभागी आहे का, तसेच उर्वरित मुद्देमाल कुठे आहे याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या घरांमधील सुरक्षा आणि विश्वासू कर्मचाऱ्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्वसामान्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.