मुंबई,
Tukaram Mundhe's speech अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारताच राज्यभरात भेसळखोर आणि बेकायदेशीर अन्न व गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम सुरू झाली आहे. त्यांच्या पदभारानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रशासनाने जोरदार कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले असून भेसळ व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभरात सुमारे 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 30 आणि 31 मे रोजी झालेल्या या कारवाईत 32 आरोपींना अटक करण्यात आली असून 24 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान 26 आस्थापनांना सील करण्यात आले असून सुमारे 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोकण विभागात सर्वाधिक 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी छापे टाकून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली असून जप्त केलेल्या वाहनांची किंमत सुमारे 2.60 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये भारतीय दंडसंहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि खेड तालुक्यात पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. यात गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि संशयित अन्नपदार्थांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी परवानगीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि बेकायदेशीर विक्रीवर कडक कारवाईचा इशारा दिला असून लवकरच तक्रारींसाठी नवीन मोबाईल अॅप आणि टोल-फ्री क्रमांक सुरू केला जाणार आहे. अन्नाशी खेळ करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. 25 मे रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांनी विभागात आक्रमक कारवाईचा धडाका लावल्याने अन्न व औषध प्रशासन अधिक सक्रिय झाले असून पुढील काळात ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.