आयपीएलनंतर वैभव सूर्यवंशीची नवी झेप

इंडिया ‘अ’ संघातून श्रीलंकेत दमदार आव्हान

    दिनांक :02-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi's new leap आयपीएल २०२६ मधील प्रभावी कामगिरीमुळे चर्चेत आलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता भारतीय क्रिकेटच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अवघ्या काही दिवसांत तो इंडिया ‘अ’ संघाच्या जर्सीत मैदानावर उतरणार असून श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत त्याला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत भारत ‘अ’, श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ हे संघ सहभागी होणार आहेत. भारताचा पहिला सामना ९ जून रोजी यजमान श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. आयपीएलमधील कामगिरीनंतर वैभव पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
 
 
Dispute
 
या मालिकेसाठी तिलक वर्माकडे भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. सुरुवातीला रियान परागला नेतृत्वगटात स्थान देण्यात आले होते, मात्र दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली.वैभव सूर्यवंशीसाठी ही निवड विशेष मानली जात आहे. त्याला प्रथमच इंडिया ‘अ’च्या लिस्ट ‘अ’ संघात संधी मिळाली आहे. यापूर्वी त्याने इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रतिनिधी गटातून टी-२० स्वरूपात सहभाग नोंदवला होता. आता ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
भारत ‘अ’च्या संघात प्रियांश आर्य, आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, समीर रिझवी, प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांसारखे अनेक युवा खेळाडू आहेत. तर गोलंदाजीची जबाबदारी विजय कुमार, यश ठाकूर, युवराज सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान यांच्यावर असेल. श्रीलंकेतील ही तिरंगी मालिका अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मोठी संधी मानली जात आहे. राष्ट्रीय संघाच्या दारात उभ्या असलेल्या या युवा क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वैभव सूर्यवंशीसाठीही ही स्पर्धा भविष्यातील भारतीय संघातील स्थानाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.