दोन्ही बाजुने होती वकिलांची फौज
अमरावती विधान परिषद निवडणूक
अमरावती,
Viplav Bajoria' विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकूण ५ जणांनी नामांकन अर्ज दाखल केले. मंगळवारी अर्जाची छाननी होती. अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरीया यांच्या अर्जावर भाजपासह उर्वरीत तीनही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बाजोरीया यांचा अर्ज अवैध ठरविला.
विप्लव बाजोरीया यांनी सोमवारी अगदी शेवटच्या क्षणी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता. विप्लव हे परभणी व हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार आहे. त्यांना तेथून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अमरावतीत अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर छाननी दरम्यानच भाजपा उमेदवार प्रवीण पोटे व अन्य तीन उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. विप्लव यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण नियमानुसार नोंदविलेले नाही, हा प्रमुख आक्षेप होता.
त्या आक्षेपावरच बराच वेळ सुनावणी सुरू होती. बाजोरीया यांचे वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, संपत्तीचे विवरण अर्जासोबत दिलेल्या जोडपत्रात आहे आणि त्याचे नंबर अर्जातल्या रकान्यांमध्ये नोंदविलेले आहे. यापूर्वी जी निवडणूक बाजोरीया यांनी लढविली होती, तेव्हा ही त्यांनी याच पद्धतीने अर्ज दिल्याचे सांगण्यात आले. विरुद्ध बाजुच्या वकीलांचे म्हणने होते की, जोडपत्रातही संपूर्ण माहिती दिलेली नाही. मुळात अर्जाच्या रकान्यातच ती देणे आवश्यक असते. निवडणुक निर्णय अधिकारी आशिष येरेकर, निवडणूक निरीक्षक यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी विप्लव बाजोरीया यांचा अर्ज अवैध ठरविला. निर्णय देतांना त्यांनी सांगितले की, बाजोरीया यांनी अर्जाचा जो नमुना देण्यात आला होता, त्या प्रमाणे अर्ज भरलेला नसल्याने तो अवैध ठरविला. आजच्या छाननीत भाजपाचे प्रवीण पोटे, वंचित आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रशांत महल्ले व काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांचा अर्ज वैध ठरला.
बाजोरीया उच्च न्यायालयात जाणार
निवडणूक निर्णय अधिकार्यांनी विप्लव बाजोरीया यांचा अर्ज अवैध ठरविल्यानंतर त्यांनी सदर निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते बुधवारी याचिका दाखल करणार आहे. ही निवडणूक न्यायालयाच्या फेर्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजोरीयांची जिद्द लक्षात घेता ते शेवटपर्यंत संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी ही निवडणूक लढायचीच असल्याचे दिसते.