अनिल कांबळे
नागपूर,
neet exam उद्या रविवार देशभरात होणाऱ्या 'नीट' फेरपरीक्षेच्या २४ तासाअगोदर नॅशनल टेस्टिंग एजन्सीमधील गोंधळ समोर आला. नागपुरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला शहरातील परीक्षा केंद्राऐवजी चक्क विदेशातील म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीच्या अबूधाबी येथील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षेचे प्रवेशपत्र बघताच विद्यार्थ्याची भंबेरी उडाली. हा धक्कादायक प्रकार प्रसारमाध्यमातून समोर येताच अखेर 'एनटीए'ला चूक लक्षात आली. एनटीए एजन्सीने आपली तांत्रिक चूक मान्य करत या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र बदलून देण्याचे ठरवले. त्या विद्यार्थ्याला आता नागपूर शहरातील परीक्षा केंद्र दिले आहे. एनटीएच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागपूरचा रहिवासी असलेला नीटचा परीक्षार्थी अब्दुल्लाह याच्या परीक्षा केंद्राबाबत निर्माण झालेल्या गोंधळानंतर एनटीएने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून यावर स्पष्टीकरण दिले आहे. एनटीएने लिहिले की, ‘या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात असून, योग्य पडताळणी केल्यानंतर पुढील काही तासांतच संबंधित उमेदवाराला नागपूरमध्ये नवीन परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले जाईल.’ एनटीएच्या या तत्परतेमुळे अब्दुल्लाहचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी तात्काळ 'एनटीए'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधून हा घोळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. अधिकाऱ्यांनीही ही तांत्रिक चूक असल्याचे सुरुवातीलाच मान्य केले होते. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट युजी २०२६ च्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. परीक्षेची सर्व महत्त्वाची माहिती आणि केंद्राचे तपशील आता उमेदवारांना थेट त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे पाठवले जात आहेत. २१ जूनच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गोंधळ किंवा संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे. एनटीएने वेळेत आपली चूक सुधारल्यामुळे नागपूरच्या या विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, नीट परीक्षेतील पुन्हा गोंधळ आणि कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नीट परीक्षेचे प्रवेशपत्र बघताच आम्हाला धक्का बसला. आम्ही अधिकृतरित्या परीक्षा केंद्र विदेशात मिळाल्याची तक्रार केली आहे. त्यांनी नागपुरातील परीक्षा केंद्र देण्यात येणार असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आम्ही समाधानी जरी असलो तरीही या मानसिक त्रासामुळे मुलाचे लक्ष विचलीत झाले आहे. त्यामुळे त्याचा परीणाम दिसण्याची शक्यता आहे. मुलाची समजूत घालून त्याला अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला आम्ही दिला आहे.
- डॉ. मोहम्मद तालिब (विद्यार्थ्याचे वडिल)