20 वर्षांच्या खटल्याला मोठा ट्विस्ट; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
मुंबई
Pawanraje Nimbalkar murder case तब्बल दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अखेर विशेष सीबीआय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी म्हणून नमूद असलेले माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्याअभावी आणि साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगतीमुळे आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
 

All accused, including Padamsinh Patil, acquitted in the Pawanraje Nimbalkar murder case. 
या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबीयांसह संबंधित वर्तुळात मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. राज्यभरात या निकालाकडे मोठे लक्ष लागले होते.3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे प्रवास करत असताना कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनाला अडवून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.तपास यंत्रणांनी या प्रकरणात माजी खासदार पद्मसिंह पाटील, व्यावसायिक सतीश मंदाडे, निवृत्त अधिकारी मोहन शुक्ला यांच्यासह काही आरोपींवर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप ठेवला होता. न्यायालयीन नोंदींनुसार, या हत्येसाठी सुमारे 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला होता. तसेच पारसमल जैन हा या प्रकरणात माफीचा साक्षीदार ठरला होता.
 
 
विशेष सीबीआय न्यायालयाने Pawanraje Nimbalkar murder case  निकाल देताना सुमारे 127 ते 128 साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करण्यात आल्याचे नमूद केले. मात्र माफीचा साक्षीदार म्हणून दिलेले जबाब विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याच्या जबाबांमध्ये अनेक विसंगती असून, वेगवेगळ्या वेळी दिलेल्या कबुलीजबाबांमध्ये तफावत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.न्यायालयाने निकालात तपास प्रक्रियेतील त्रुटींवरही बोट ठेवले. चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी माफीच्या साक्षीदाराचा पुन्हा जबाब नोंदवण्यात आला होता, मात्र त्यावर न्यायाधीशांची स्वाक्षरी नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रक्रियात्मक त्रुटींमुळे पुराव्यांची विश्वासार्हता कमी झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आणि त्यामुळे आरोपींना शिक्षा देता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला.
 
 
या प्रकरणातील सर्व आरोपींमध्ये पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचा समावेश होता. सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.पवनराजे निंबाळकर हे धाराशिवमधील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केला. या प्रकरणाच्या निकालामुळे गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायप्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.