अल्लीपूर,
Allipur liquor ban अल्लीपूर अंतर्गत येणार्या ४२ गावांत आजपर्यंत पाहायला मिळाली नाही ती अघोषित दारूबंदी नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी प्रत्यक्षात करून दाखवल्याने परिसरात महिला ठाणेदारांचे कौतुक होत आहे.
आजपर्यंत अनेकदा प्रत्येक गावात महिला दारूबंदी गटांतर्गत व अनेकदा वॉश आउट दारूबंदी करूनही दारू मिळतच राहिली आणि सहज उपलब्ध होत होती. पण आता चित्र वेगळे पाहावयास मिळत असल्याने नवीन महिला ठाणेदार कौतुकास पात्र ठरत आहेत. महिला ठाणेदार असा मोठा निर्णय घेतील आणि एका झटयात संपूर्ण ४२ गावातही दारूबंदी करतील असे वाटत नव्हते. आता कुठेही मोहा, देशी, इंग्लिश दारूसह सटापट्टी, जुगार सर्व अवैद्य धंद्यांवर वचक बसला आहे. त्यामुळे अवैद्य धंदेवाल्याचे धाबे दणाणले असून आता पुढे व्यवसाय करता येणार की नाही या चिंतेने ग्रासली आहे.
ठाणेदार संगीता हेलोंडे व सहायक उप निरीक्षक वर्षा तांदूळकर या दोन्ही महिलांनी मनावर घेतल्याने परिसरात आजतरी अघोषित दारूबंदी जाणवत आहे. अवैध रेती व्यवसाय भागात फोफावला आहे. याशिवाय लहानमोठे अवैध धंदे सुरू होते. त्या सर्व धंद्यांना ठाणेदार संगीता यांनी शंभर टक्के आळा घातल्याने सर्वत्र समाधान शांतता दिसून येत आहे.वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार सर्वत्र दारूबंदी मोहीम सुरू असल्याने त्याची आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी अल्लीपूर परिसरातील ४२ गावातही प्रत्यक्षरीत्या करीत असल्याची प्रतिक्रिया ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी दिली.