- वाहनासह तीन लाकूड तस्कर अटकेत;
डोंगरगाव सहवनक्षेत्रातील धडक कारवाई
गोंदिया,
Arrested for timber smuggling जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वन विभागाने आंतरराज्यीय लाकूड तस्करी करणार्या ‘पुष्पागँग’वर मोठी कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनासह तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई डोंगरगाव डेपो सहवनक्षेत्रांतर्गत करण्यात आली.
वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो अंतर्गत डोंगरगाव, पुतळी व सहाकेपार बीट तसेच पांढरवानी बफर सहवनक्षेत्रातील कोयलारी-शेंडा परिसरात संयुक्त पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, 20 जून रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील सालेधारणी-डोंगरगाव मार्गावर संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-35 एजे-1154 मधून सागवान प्रजातीच्या लाकडाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेत तीन आरोपींना अटक केली. निलेश हिरालाल मेश्राम रा. कोयलारी-प्रधानटोला, ता. सडक अर्जुनी, ओंकार सहदेव सोनवाने रा. आलेडन, जि. राजनांदगाव (छ.ग.) आणि खोमन बुधराम लोहार रा. दिवाणटोला, जि. राजनांदगाव (छ.ग.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तिन्ही आरोपींना सडक अर्जुनी न्यायालयात हजर करण्यात आले असून ही कारवाई क्षेत्र सहाय्यक व्ही. बी. रहिले (पांढरवानी), चक्रधर एस. डोरले (डोंगरगाव-खजरी), वनरक्षक पवन कांबळे, मेहबूब सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसळे, वनिता ब्राह्मणकर, शालू मेंढे, वनमजूर यशवंत शेंडे तसेच श्रीकांत बंसोड आणि समीर बंसोड यांनी केली. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करी करणार्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
...