बांगलादेशचा चीनकडे वाढता कल!

तीस्ता प्रकल्पावर मोठ्या करारांची तयारी

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
ढाका,
Bangladesh towards China बांग्लादेश आता परराष्ट्र धोरणात मोठे बदल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताशी दीर्घकाळ घनिष्ठ संबंध राखणारा बांगलादेश आता आर्थिक आणि सामरिक फायद्यांसाठी China सोबत अधिक जवळीक साधताना दिसत आहे. आगामी चीन दौऱ्यात बांगलादेशकडून अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता असून, यामुळे प्रादेशिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार, बांगलादेश आणि चीन यांच्यात सुमारे १५ ते १७ महत्त्वपूर्ण करार आणि सामंजस्य करारांवर सहमती होण्याची शक्यता आहे. या करारांमध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत तीस्ता नदी प्रकल्प हा सर्वात संवेदनशील मुद्दा ठरला आहे.
 
 
 
Bangladesh towards China
तीस्ता नदी प्रकल्प भारत आणि बांगलादेश यांच्यात दीर्घकाळ चर्चेचा विषय राहिला आहे. आता या प्रकल्पात चीनच्या संभाव्य सहभागामुळे भारताच्या रणनीतिक चिंता वाढल्या आहेत. भारताच्या सीमेजवळ चीनची वाढती उपस्थिती भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ढाकाच्या या हालचाली केवळ आर्थिक गरजांपुरत्या मर्यादित नसून, त्यामागे व्यापक सामरिक विचार असल्याचे मानले जात आहे. सध्या बांगलादेश आर्थिक दबाव, परकीय चलन साठ्यातील घट आणि विकास प्रकल्पांसाठी निधीअभावी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत चीनकडून मोठी आर्थिक मदत किंवा सवलतीच्या कर्जाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
या दौऱ्यात बांगलादेशचे वरिष्ठ नेतृत्व बीजिंगमध्ये चीनच्या उच्चस्तरीय नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकींमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच नवीन गुंतवणूक, व्यापार विस्तार आणि संपर्क व्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील सामरिक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः भारतासाठी ही परिस्थिती बारकाईने पाहण्यासारखी ठरली आहे. बांगलादेश-चीन जवळीक वाढल्यास त्याचा परिणाम भविष्यात प्रादेशिक संतुलनावर होऊ शकतो.