कोलकाता,
Bank accounts of Trinamool frozen पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ममता बॅनर्जीं यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला पक्षाला मोठा आर्थिक धक्का बसला असून, पक्षाशी संबंधित तीन महत्त्वाची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमधील व्यवहारांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, त्यामुळे पक्षाच्या आर्थिक हालचालींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा आहे. सध्या या खात्यांमधून पैसे काढणे किंवा अन्य आर्थिक व्यवहार करणे थांबवण्यात आले आहे. यामुळे पक्षाच्या अंतर्गत वादाने आता आर्थिक स्वरूप धारण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घडामोडींच्या केंद्रस्थानी पक्षाचे माजी खजिनदार अरूप बिस्वास आहेत. त्यांनी बँकेला पत्र पाठवून पक्षाच्या खात्यांवरील व्यवहार गोठवण्याची मागणी केली होती. पक्षाच्या नेतृत्वावर आणि आर्थिक नियंत्रणावर गंभीर मतभेद निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. वाद निकाली निघेपर्यंत निधी सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याची चर्चा आहे. काही खासदारांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. यामुळे पक्षाच्या मालमत्ता, निधी आणि अधिकृत नेतृत्वावरून संघर्ष वाढत असल्याचे दिसत आहे.
पक्षाच्या आर्थिक अहवालानुसार, तृणमूल काँग्रेसकडे हजारो कोटींची मालमत्ता असून त्यातील मोठा हिस्सा बँक खात्यांमध्ये आणि गुंतवणुकीत आहे. अशा परिस्थितीत खात्यांवरील निर्बंध हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.