२३ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक : एसएसबी पथकाची धडाकेबाज कारवाई
अनिल कांबळे
नागपूर,
Cannabis seized in Wadi गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वाडी पोलिस ठाणे हद्दीत अमरावती-नागपूर रोडवर उभ्या असलेल्या एका ट्रकमधून ३५ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. कारवाईत पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करीत एकूण २३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहम्मद शफीक वल्द मोहम्मद जहरूद्दीन खान (३२, सद्भावना सोसायटी, कडोदरा वरेली, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एवढ्या मोठ्या कारवाईमुळे सध्या सुरु असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ची पोलखोल केली आहे.
माहितीनुसार, शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दर्शन पाटील हे अंमलदारासह गस्त घालत होते. दरम्यान, वाडी हद्दीतील ईडीएम अड्डा रेस्ट्रो लाऊंजसमोरील रस्त्यावर एक ट्रक (डीएन ०९ व्ही ९०१२) संशयास्पद स्थितीत उभा असलेला दिसला. ट्रकचालक कोणाची तरी वाट पाहत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली असता पोत्यामध्ये पॅक केलेली सहा पाकिटे सापडली. त्यात ३५ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद शफीकची चौकशी केली असता, त्याने हा गांजा त्याचा साथीदार अयाज खान याने खरेदी-विक्रीसाठी आणून दिल्याची कबुली दिली. आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हा गांजा बाळगून विक्री करण्याच्या तयारीत होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मुद्देमालासह त्याला वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एनडीपीएस पथकापेक्षा सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थावर कारवाई करीत आहेत. त्यामुळे एनडीपीएस विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.