मुंबई
Doraemon जगभरातील मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अॅनिमेटेड पात्र डोरेमोन पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘डोरेमोन द मूव्ही: न्यू नोबिता अँड द कॅसल ऑफ द अंडरसी डेव्हिल’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तब्बल दोन दशकांनंतर डोरेमोनचा चित्रपट भारतीय सिनेमागृहांत दाखल होत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी अधिकृत पोस्टर प्रदर्शित करत या प्रदर्शनाची घोषणा केली. यासोबतच 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पॉप-कल्चर फेस्टिव्हलमधून चित्रपटाच्या प्रचार मोहिमेला प्रारंभ होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या घोषणेनुसार हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, मुंबईत 20 आणि 21 जून रोजी चाहत्यांसाठी विशेष फॅन-एंगेजमेंट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमधून डोरेमोनच्या चाहत्यांना विविध आकर्षक आणि मनोरंजक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘न्यू नोबिता अँड द कॅसल ऑफ द Doraemon अंडरसी डेव्हिल’ या चित्रपटाची कथा नोबिता, डोरेमोन आणि त्यांच्या मित्रांच्या समुद्राखालील थरारक साहसी प्रवासाभोवती फिरते. या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मैत्री, धैर्य, टीमवर्क आणि नवनवीन शोध या मूल्यांवर आधारित ही कथा प्रेक्षकांना एका रोमांचक आणि कल्पनारम्य जगाची सफर घडवणार आहे.हा चित्रपट प्रसिद्ध मंगाकार फुजिको एफ. फुजिओ यांच्या लोकप्रिय मंगा मालिकेवर आधारित असून, त्यांच्या कल्पनाशक्तीने सजलेली ही कथा आणि तिची पात्रे अनेक पिढ्यांच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहेत.
डोरेमोन हे पात्र जगातील सर्वाधिक लोकप्रिय अॅनिमेटेड पात्रांपैकी एक मानले जाते. भविष्यातून आलेली कान नसलेली रोबोटिक मांजर अशी त्याची ओळख असून, तो आपल्या जादुई गॅझेट्सच्या साहाय्याने नोबिताला मदत करताना दिसतो. गेल्या अनेक दशकांपासून ही मालिका मुलांबरोबरच तरुण आणि प्रौढ प्रेक्षकांमध्येही तितकीच लोकप्रिय आहे.
दोन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर डोरेमोन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत असल्याने हा चित्रपट चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.