गडचिरोली
el niño गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरणालाही चालना मिळाली आहे. आगामी काळात संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे कमी पर्जन्यमान किंवा पाणीटंचाईसारखी आव्हाने निर्माण झाल्यास त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी ही जलसंधारणाची कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 6,015 जलसंधारण कामे पूर्ण झाली असून त्यातून 18,750 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. तसेच प्रगतिपथावरील कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी 2,060 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण होणार आहे.
el niño पूर्ण झालेल्या कामांमध्ये 1,329 बोडी खोलीकरण, 767 फळबाग लागवड, 1,064 शेततळे, 323 गॅबियन बंधारे, 387 रिचार्ज शाफ्ट, 207 कोल्हापुरी बंधारे तसेच वनक्षेत्रातील वनराई बंधारे, वनतळे आणि एलबीएससारख्या विविध मृद व जलसंधारण कामांचा समावेश आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे अधिकाधिक संधारण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 4,638 कामे पूर्ण झाली असून त्यातून 9,340 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेत बोरी खोलीकरण, शेततळे, मजगी, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, रिचार्ज शाफ्ट, सिमेंट नाला बंधारे आणि तलाव दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
el niño प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत 1,042 कामे प्रस्तावित असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेततळे, मजगी, गॅबियन बंधारे, डीप सीसीटी आणि एलबीएसची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमधून 5,200 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, हवामानातील बदल आणि संभाव्य अल निनोच्या पृष्टभूमीवर जलसुरक्षा अधिक महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांमधून निर्माण झालेली जलसाठा क्षमता आणि भूजल पुनर्भरणाची व्यवस्था ही भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. प्रलंबित जलसंधारण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.