तेहरान,
Female singer sentenced to 74 lashes in Iran इराणमधील सांस्कृतिक आणि कायदेशीर नियमांवर पुन्हा एकदा जगभरातून चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी हिच्यावर इराणमधील न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली असून, तिला ७४ फटके मारण्याचा आदेश तसेच दोन वर्षांसाठी देश सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे कला जगतात आणि मानवाधिकार संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ही संपूर्ण घटना डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या एका ऑनलाइन लाइव्ह कॉन्सर्टनंतर सुरू झाली. या कॉन्सर्टमध्ये परस्तू अहमदीने हिजाब न घालता आणि बाही नसलेला पोशाख परिधान करून सादरीकरण केले होते. हा कार्यक्रम तिने यूट्यूबवर प्रसारित केला होता आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळाले होते. मात्र हा व्हिडिओ इराणमध्ये वेगाने पसरल्यानंतर वाद निर्माण झाला आणि अधिकाऱ्यांनी याकडे गंभीर दृष्टीने पाहिले.

इराणमधील कोम प्रांतातील न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार परस्तू अहमदी आणि तिच्या टीममधील आठ सदस्यांना प्रत्येकी ७४ फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच तिच्यावर कोणतेही कलात्मक काम करण्यावर बंदी घालण्यात आली असून, पुढील दोन वर्षे तिला देशाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी हा प्रकार “नियमांचे उल्लंघन आणि अश्लील सामग्रीचे प्रसारण” असल्याचे नमूद केले आहे. या निर्णयानंतर अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि कलाविश्वातील व्यक्तींनी या कारवाईचा निषेध केला आहे. त्यांच्या मते, ही शिक्षा अत्यंत कठोर असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारी आहे.
परस्तू अहमदी यांचा यूट्यूबवरील हा कार्यक्रम विशेष चर्चेत आला होता. त्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले होते, ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले. मात्र इराणमधील कडक नियमांनुसार महिलांच्या सार्वजनिक सादरीकरणावर आणि हिजाबसंबंधी कायद्यांवर कठोर बंधने आहेत. परस्तू याआधीही हिजाबविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा इराणमधील सांस्कृतिक नियम, महिला स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती हक्क यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद सुरू झाला आहे.