नवी दिल्ली,
Good news for EPFO members देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पीएफ खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे, ७ कोटींहून अधिक खातेधारकांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्च महिन्यात ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला होता. ही शिफारस मंजुरीसाठी केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. आता या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्याने व्याज जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, ईपीएफओकडून व्याजाची रक्कम थेट सदस्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाणार आहे. तांत्रिक प्रक्रियेनंतर ही रक्कम लवकरच खात्यात दिसू शकते. त्यामुळे कर्मचारी आता त्यांच्या खात्यात व्याज जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
गेल्या काही वर्षांत ईपीएफओ व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र सलग दुसऱ्या वर्षी ८.२५ टक्के दर कायम ठेवण्यात आल्याने खातेधारकांना स्थिर परतावा मिळणार आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्ये व्याजदर ८.१५ टक्के होता, तर २०२१-२२ मध्ये तो ८.१० टक्क्यांवर घसरला होता, जो अनेक वर्षांतील नीचांकी स्तर मानला गेला. पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि व्याजाची रक्कम तपासण्यासाठी ईपीएफओ पोर्टल, उमंग अॅप किंवा मिस्ड कॉल सेवेसारखे पर्याय उपलब्ध आहेत. व्याज जमा झाल्यानंतर संबंधित सदस्यांना त्याची माहिती ऑनलाइन सहज पाहता येणार आहे. या निर्णयामुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, बचतीवर चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.