अवैध मद्यपान अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
*चार ग्राहकांसह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
*21 हजार 950 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर, 
Illegal liquor den राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थाई टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यास आवश्यक ते साहित्य/ सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले.
 
 
maddsk
 
कारवाईदरम्यान 4 ग्राहक मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ, अंबादास नानाजी थेरे हे प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
 
 
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरिक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरिक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे, जवान जगदिश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर, विलास महाकुलकर यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारु, अवैध मद्यपान अड्डे किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्याची माहिती मिळाल्यास, त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8422001133 वर त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावी. माहिती देणार्‍याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
या मोहिमेत देशी दारुच्या 200 सीलबंद बाटल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या अशी एकूण 15270 रुपये किंमतीची दारु, काउंटरवर असलेली 2750 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 21950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.