नवी दिल्ली
France Innovation Roadmap भारत आणि फ्रान्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), उच्च शिक्षण, अंतराळ संशोधन, आरोग्य, स्टार्टअप्स आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन रोडमॅप 2030’ जाहीर केला आहे. या महत्त्वाकांक्षी करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकांसाठी जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
या रोडमॅपअंतर्गत 2030 पर्यंत 30 हजार भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रतांची परस्पर मान्यता, संयुक्त पदवी अभ्यासक्रम आणि संशोधन सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई, दिल्ली, मद्रास, हैदराबाद तसेच आयआयएससी बेंगळुरू यांसह विविध भारतीय संस्थांनी फ्रान्समधील विद्यापीठे आणि उद्योगसमूहांसोबत 19 सहकार्य करार केले आहेत.
भारत आणि फ्रान्स यांनी ‘ट्रस्टेड एआय’ अर्थात विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित, पारदर्शक आणि मानवी हक्कांचा आदर करणाऱ्या एआय प्रणालींच्या विकासावर भर दिला जाणार आहे. तसेच ऑनलाइन बालसुरक्षा, चुकीच्या माहितीवर नियंत्रण, गोपनीयतेचे संरक्षण आणि डेटा शेअरिंगसाठी विश्वासार्ह चौकट उभारण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सहकार्य वाढवण्यावर भर
या करारांतर्गत ऊर्जा, France Innovation Roadmap हवामान बदल, थ्री-डी संगणन, एरोनॉटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्टार्टअप्स क्षेत्रातील संशोधन व नवोन्मेषाला चालना दिली जाणार आहे. भारत-फ्रान्स इनोव्हेशन नेटवर्कची स्थापना, स्टार्टअप्ससाठी ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन ब्रिज’ आणि कानपूर येथे एरोनॉटिक्स प्रशिक्षण कॅम्पस उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.अंतराळ क्षेत्रातही दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्यावर भर दिला असून पृथ्वी निरीक्षण, मानवी अंतराळ मोहिमा आणि भविष्यातील लो-अर्थ ऑर्बिट स्पेस स्टेशनसंदर्भातील संयुक्त उपक्रमांवर काम करण्याचे ठरवले आहे.फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा दिल्यानंतर हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे भारताच्या ‘विकसित भारत 2047’ आणि फ्रान्सच्या ‘फ्रान्स 2030’ या महत्त्वाकांक्षी योजनांना बळ मिळणार असून विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रासाठी नव्या संधींचे दालन खुले होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.