अशा पक्षात फूटच पडणार हो!

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
अग्रलेख
Indian Politics राजकारण आणि पाडापाडी किंवा फुटाफूट यांचे काहीतरी सख्य असावे. भारतीय राजकारणाचा पट पाहिला तर असे दिसेल की, देशात भाजपा वगळता एकही पक्ष असा नाही, जो कधीतरी फुटला नाही. याचे महत्त्वाचे कारण असे की, भाजपा वगळता इतर बहुतांशी पक्ष हे व्यक्तिकेंद्री किंवा परिवारवादी आहेत. इतिहासात असे दिसते की, काँग्रेस आणि जनता दलाचे सर्वाधिक तुकडे झाले. त्यामुळे आज आपल्या देशातील अनेक पक्षांची नावे काँग्रेस आणि जनता दलावरून आहे. काँग्रेसमधून बाहेर पडणारा नेता आपल्या नव्या पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ राहील, याची काळजी घेतो. उदा. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. तसाच प्रकार जनता दलाच्या बाबतीतही आहे. जनता दलातून फुटून बाहेर निघालेल्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नावात ‘जनता दल’ हे शब्द कायम ठेवले आहे. उदा. राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि धर्मनिरपेक्ष जनता दल. मूळ पक्षाच्या नावाची गोधडी पांघरल्याशिवाय या नेत्यांना राजकीय अस्तित्व सिद्ध करता येत नसावे. काही नेते तर मूळ पक्षातून बाहेर पडतात आणि मूळ पक्षावर आणि त्याच्या निवडणूक चिन्हावरही दावा करतात. उदाहरणार्थ एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी आपला गट हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करीत त्या पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही मिळविले. आता त्याच मूळ शिवसेनेत म्हणजे जिचा उल्लेख सध्या उपरोधाने ‘शिल्लकसेना’ असा केला जातो, तीत आणखी एक फूट पडली आहे आणि त्या फुटीचा ठपका भाजपावर ठेवला जात आहे.
 
 
mamata
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नावावरून संभ्रम होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने दोन पक्षांचे बारसे केले होते. एकाला शिवसेना-एकनाथ शिंदे तर दुसऱ्याला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे लांबलचक नाव रोज घेणे शक्य नसल्यामुळे तो पक्ष शिवसेना-उबाठा म्हणून ओळखला जाऊ लागला. लोकसभेत शिवसेना-उबाठाचे एकूण नऊ खासदार होते. त्यातील सहा खासदारांनी बाहेर पडत आपल्याला वेगळा गट म्हणून मान्यता देण्याची व नंतर शिवसेना शिंदे गटातील आपल्या विलीनीकरणालाही मान्यता देण्याची विनंती करणारे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. सध्या काही तांत्रिक कारणामुळे शिवसेनेतील ही फूट प्रत्यक्षात आली नसली, तरी ती पडली आहे, हे तर खरेच. पण, या फुटीला त्या पक्षाचे नेतृत्वच कारणीभूत आहे, अन्य कुणीही नाही. राजकारण्यांमध्ये आता पक्षाच्या विचारधारेवर अव्यभिचारी निष्ठा राहिलेली नाही. तत्त्वाचे आणि मूल्यांचे राजकारण करायला आज कोणाला वेळ नाही; सगळेच संधिसाधू झाले आहेत. त्यामुळे फूट पडण्यात नवलाई राहिलेली नाही. नवलाई एवढीच की, कोणत्याही पक्षात फूट पडली तरी त्याचे खापर भाजपावर फोडले जाते. खरे तर भाजपाच्या केंद्रातील सरकारकडे भक्कम बहुमत आहे. भाजपाच्या महाराष्ट्रातील सरकारकडेही तीन चतुर्थांश बहुमत आहे. त्यामुळे भाजपाला कोणताही पक्ष फोडण्याची गरज नाही. तरीही फूट पडत असते. आधी तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. आता महाराष्ट्रातील शिवसेना उबाठात फूट पडली. या फुटीचे कारण भाजपा नव्हे तर त्या पक्षाचे नेतृत्व आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही.
 
 
 
Indian Politics  त्यामुळे त्यांच्या पक्षातून आधी ५८ आमदार बाहेर पडले, नंतर २० खासदारांनीही त्या पक्षाला रामराम केला. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सलग १५ वर्षे राज्य केले, मुख्यमंत्रिपद सांभाळले. पण, या काळात त्यांची आणि त्यांचा अतिमहत्त्वाकांक्षी भाचा अभिषेक बॅनर्जी यांची वागणूक आपल्या आमदारांना-खासदारांना कस्पटासमान लेखण्याची होती. पक्षाचे आमदार आणि खासदार आपले घरगडी आहेत, अशा पद्धतीने ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी वागत होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या आमदार आणि खासदारांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना त्यांची जागा दाखवली. कितीही सहन करतो असे म्हटले तरी संधी मिळाल्यावर अपमानाची परतफेड करण्यास माणसं विसरत नाहीत. तेच घडले. शिवसेना उबाठातील फुटीमागेही तृणमूलप्रमाणे हेच महत्त्वाचे कारण आहे. उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही आणि आपले आमदार-खासदारही जपता आले नाहीत. पक्षातून एखाददुसऱ्या नेत्याने बाहेर पडणे आणि पक्षात फूट पडणे यात फरक आहे. शिवसेनेतून यापूर्वीही अनेक नेते बाहेर पडले. तेव्हा भाजपावर कोणताही आरोप झाला नाही. कारण भाजपा हा तेव्हा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. आता तशी स्थिती राहिलेली नाही. आता उबाठा गटात खुट्ट जरी वाजले तरी भाजपाला दोष दिला जातो. आपल्याला घर सांभाळता येत नाही, हे उद्धव ठाकरे आणि त्यांची पालखी वाहणाऱ्यांना दिसत नाही. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडले त्यावेळी शिवसेनेला सरकार गमवावे लागले. मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हाही भाजपाला दोष दिला गेला. आपले दरबारी राजकारण आपल्याला भोवते आहे, याकडे दुर्लक्ष केले गेले. आता पुन्हा फूट पडली. पुन्हा फुटीचे खापर भाजपावरच फोडले जात आहे. वास्तवात या दोन्ही फुटींना स्वत: उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे हे हस्तिदंती मनोऱ्यातील राजकारणी आहेत. त्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा करिश्मा नाही. त्यांच्यासारखे नेतृत्व आणि वक्तृत्वही नाही. मुख्यमंत्रिपदाची ओढून-ताणून आणलेली संधी उद्धव ठाकरेंना मिळाली होती. पण कोणतीही जबाबदारी न घेण्याच्या स्वभावामुळे त्यांनी त्या संधीचे सोने करण्याऐवजी माती केली. मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात सर्वांत कमी वेळा गेलेले महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरेच असावेत. राज्यातील जनतेला तर सोडाच; पण आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांनाही उद्धव ठाकरे भेटत नाहीत. सामान्य शिवसैनिकांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. खरा नेता तोच असतो, जो आपल्या कार्यकर्त्यांना भेटत असतो, आमदार-खासदारांच्या संपर्कात असतो, त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवत असतो. उद्धव ठाकरे यांना यातले काहीच जमले नाही. आपल्या कार्यकर्त्यांसाठी नेता सदैव उपलब्ध असला पाहिजे, त्यांच्यासाठी धावून गेला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी अन्य पक्षातील नेत्यांच्या स्वभावाचा आणि आचरणाचा अभ्यास केला पाहिजे. कधी काळी मित्रपक्ष राहिलेल्या भाजपाचे नेते कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना कसे वागवितात, हे त्यांनी नव्याने पाहिले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंची वागणूक एखाद्या महाराजाला साजेशी आहे. बाळासाहेबांचे वारसदार या नात्याने शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. हे पद त्यांना कर्तृत्वाने नव्हे तर वारशाने मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांशी आणि समस्यांशी कधीच देणेघेणे नव्हते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भोवती संजय राऊत यांच्यासारखे सल्लागार गोळा केले आहेत. नेत्याने ऐकायचे सर्वांचे, पण करायचे आपल्या मताने अशी पद्धत आहे. उद्धव ठाकरे आपल्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटतच नसतील तर त्यांना राजकारणात नेमके काय चालले आहे हे कसे कळणार? भाजपाला दोष देणे सर्वांत सोपे आहे. पण, अशा दोषारोपणातून त्यांचा पक्ष सुधारत नाही. तो अधिक व्यक्तिकेंद्रित होत जातो. कारण सभोवतालच्या व्यक्ती कमी होत जातात. उबाठा गटाचे तसेच झाले आहे. तृणमूल काँग्रेसचेही तेच झाले आहे. अशा पक्षांत फूट पडणार नाही तर दुसरे काय होणार हो?