ढाका,
Jai Shri Ram in Dhaka ढाका येथे शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले, जेव्हा हजारो हिंदू नागरिक रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करताना दिसले. ‘जय श्री राम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. वादाची सुरुवात रंगपूर परिसरात प्रभू रामाच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीवरून झाली. माहितीप्रमाणे, तेथे ८१ फूट उंच मूर्ती उभारण्याचे काम सुरू होते. मात्र या प्रकल्पाला काही कट्टरपंथी गटांनी विरोध दर्शवला. प्रभू रामाच्या प्रतिमेचा अपमान झाल्याचा आरोप झाल्यानंतर हिंदू समाजात तीव्र संताप पसरला.

या घटनेच्या निषेधार्थ ढाक्यात मशाल मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी शहरातील महत्त्वाच्या भागांतून मोर्चा काढत घोषणाबाजी केली आणि धार्मिक स्वातंत्र्य तसेच अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची मागणी केली. अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.आंदोलनादरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणामुळे बांगलादेशातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहिष्णुतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही मोठी अटक झालेली नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी कायम आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बांगलादेशातील धार्मिक तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढील काही दिवस परिस्थिती कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.