- गोरगावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील फसवणूक प्रकरण
- वर्षभरापासून व्यवहाराच्या नोंदी नाही
गोंदिया,
Maharashtra Gramin Bank महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गोरेगाव शाखेतील बँक प्रतिनिधीमार्फत ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खातेदारांसह बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली असून ग्राहकांच्या तक्रारींच्या आधारे बँक प्रशासनाकडून अंतर्गत चौकशीला सुरुवात करण्यात आली असताना अनेकांच्या पासबुकात विशेषतः काही महिला बचत गटांच्या पासबुकांमध्ये वर्षभरातील व्यवहाराच्या नोंदीच करण्यात आल्या नसल्याचे पुढे आले आहे.
गोरेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत कमीशन तत्वावर असलेला बँक प्रतिनीधी डेव्हीड नान्हे याने खातेदारांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करताना लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप काही खातेदारांकडून करण्यात आला असून शुक्रवारी 19 जून रोजी काही खातेदारांनी तशी लेखी तक्रार बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे केली आहे. तर तसे पुरावेही सादर करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे शाखा व्यवस्थापकांनी नियमानुसार संपूर्ण माहिती वरीष्ठां सादर केली असून बँक प्रशासनाकडून अंतर्गत चौकशीला सुरुवातही करण्यात आली आहे. दरम्यान, बँक व्यवस्थापकांनी काल खातेदारांना केलेल्या आवाहनानुसार शनिवारी 20 जून अनेक ग्राहकांनी शाखेत येऊन आपल्या खात्याची पडताळणी केली असता आणखी काही खातेदारांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले नसल्याचे पुढे आले आहे. असे असताना या प्रकरणात आता नवे वळण आले असून काही खातेदारांच्या विशेषतः महिला बचत गटांच्या बॅक पासबूकात गेल्या वर्षभरापासून झालेल्या व्यवहाराची नोंदच करण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. एक महिला बचत गटाच्या खात्यात दर महिन्याला व्यवहार होत असताना त्यांच्या पासबुकात गेल्या जून 2025 पासून व्यवहाराच्या नोंदीच करण्यात आल्या नसल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, त्या गटाच्या सदस्यांनी बँकेकडून स्टेटमेंट मागितला असता 4 हजार 600 रुपयांची तफावत दिसून आली असल्याची तोंडी तक्रारी गटाच्या सदस्यांनी शाखा व्यवस्थापकांकडे केली आहे.