नागपूर,
'Modi lipi': Devanagari lipi राज्यातील ऐतिहासिक, प्रशासकीय, महसूल, कायदेविषयक, शैक्षणिक तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील मोडी लिपीतील जुन्या अभिलेखांचे जतन आणि त्यांचे शास्त्रशुद्ध लिप्यंतर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मराठी भाषा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे मोडी मजकुराचे मराठी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतर करण्यासाठी ३० तज्ज्ञ अभ्यासकांची अधिकृत नामावली जाहीर केली आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार ही नामावली तयार करण्यात आली असून, राज्यातील विविध विभागांमध्ये जतन करण्यात आलेल्या मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास, त्यांचे संवर्धन आणि आधुनिक पिढीसाठी त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या नामावलीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मोडी अभ्यासकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना मोडी लिपीतील दस्तावेजांचे अचूक देवनागरी लिप्यंतर तसेच आवश्यकतेनुसार इंग्रजी भाषांतर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लिप्यंतरातील अचूकता, मुदतीचे पालन आणि दस्तावेजांच्या मूळ स्वरूपाचे जतन याबाबत शासनाने स्पष्ट अटी-शर्तीही निश्चित केल्या आहेत.
ऐतिहासिक वारशाच्या जतनाला नवे बळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवेकालीन प्रशासनापर्यंतचे अनेक महत्त्वाचे दस्तावेज मोडी लिपीत उपलब्ध आहेत. कालांतराने ही लिपी सर्वसामान्यांच्या वापरातून गेल्याने अशा अभिलेखांचे वाचन आणि अभ्यास मर्यादित झाला होता. शासनाच्या या निर्णयामुळे मोडी लिपीतील दुर्मिळ आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे शास्त्रशुद्ध लिप्यंतर व भाषांतर होऊन त्यांचे संवर्धन शक्य होणार आहे. त्यामुळे संशोधक, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांना विश्वसनीय संदर्भ उपलब्ध होतील. राज्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.