‘मनी म्युल’ फसवे मायाजाळ

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
वेध 
नीलेश जोशी
‘Money Mule’ Scams ‘घरबसल्या काम करा आणि दरमहा ५० हजार रुपये कमवा’, ‘पार्ट टाईम काम करा आणि मिळवा हजारो रुपये’, ‘शिक्षण आणि वयाची कुठलीही अट नाही’ या आणि अशा स्वरूपाच्या जाहिरातीला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. झटपट पैसे कमविण्याची अभिलाषा, वाढती बेरोजगारी यासह इतर अनेक कारणे याला आहेत. या जाहिराती गावागावांत पत्रके वाटून, समाजमाध्यमांचा उपयोग करून केल्या जातात. जाहिराती असलेल्या संपर्कावर विचारणा केली असता कामाच्या स्वरूपाबाबत सांगितले जाते की, काही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल आणि त्यांना ती पुढे दुसऱ्या खात्यात पाठवावी लागेल. या कामाच्या प्रत्येक व्यवहारावर कमिशन मिळेल. बेरोजगारीमुळे त्रस्त असलेला किंवा विविध अडचणीत फसलेला युवक हे काम स्वीकारतो. काही दिवसांत त्याच्या खात्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. अचानक पोलिसांचा फोन येतो आणि त्याला कळते की, त्याच्या खात्यात आलेल्या आणि त्याने पुढे अन्य खात्यात वळत्या केलेल्या सर्व रकमा ऑनलाईन फसवणुकीतून आलेल्या होत्या. सायबर गुन्हेगार कोणत्याही व्यक्तीला थेट तुमचे खाते गुन्हेगारी व्यवहारासाठी वापरू द्या, असे सांगत नाहीत. त्याऐवजी आकर्षक ऑफर, नोकरीची संधी किंवा कमिशनच्या आमिषातून लोकांना जाळ्यात ओढले जाते. जाणता किंवा अजाणता या प्रकाराला बळी पडणाऱ्या व्यक्तींना ‘मनी म्युल’ असे संबोधले जाते.
 
 
froud
 
डिजिटल व्यवहारांच्या युगात आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. एकेकाळी बँक दरोडे, बनावट धनादेश किंवा रोकड चोरी अशा स्वरूपातील गुन्हे घडत असत. मात्र, आज इंटरनेट, मोबाईल बँकिंग, यूपीआय, ई-वॉलेट आणि ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे गुन्हेगारांनी सायबर फसवणुकीचे नवे मार्ग शोधले आहेत. अशाच धोकादायक आणि वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रकारांपैकी एक म्हणजे ‘मनी म्युल घोटाळा.’ अनेकांना या संज्ञेचा अर्थही माहिती नसतो, परंतु नकळतपणे हजारो नागरिक या गुन्हेगारी साखळीचा भाग बनत आहेत.
 
 
सायबर गुन्हेगारांनी फसवणूक, ऑनलाईन लॉटरी, गुंतवणूक घोटाळे, बनावट नोकऱ्या, डिजिटल अटक, ओटीपी फसवणूक किंवा इतर मार्गांनी मिळविलेला पैसा थेट स्वतःच्या खात्यात न घेता तो दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करतात. त्यानंतर तो पैसा विविध खात्यांमधून फिरवून अखेरीस स्वतःपर्यंत पोहोचवतात. या प्रक्रियेत ज्यांच्या खात्यांचा वापर केला जातो, त्या व्यक्तींना ‘मनी म्युल’ म्हटले जाते. म्युल म्हणजे सामान वाहून नेणारे खेचर. जसे खेचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान वाहून नेते, तसेच मनी म्युल बेकायदेशीर पैशाची वाहतूक करणारे माध्यम बनते. अनेकदा संबंधित व्यक्तीला आपण गुन्हेगारी कारवायांचा भाग बनलो आहोत, याची कल्पनाही नसते. मात्र, सहज पैसे कमविण्याच्या मोहापायी लोक यात अडकतात.
 
 
आज भारतासह जगभरातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांसमोर मनी म्युल नेटवर्क मोठे आव्हान बनले आहे. ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेला पैसा शोधणे कठीण व्हावे यासाठी गुन्हेगार अनेक बँक खाती, डिजिटल वॉलेट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा वापर करतात. त्यामुळे तपास यंत्रणांना मूळ आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरने सप्टेंबर २०२४ मध्ये संशयास्पद खात्यांची नोंदणी सुरू केली तेव्हापासून सुमारे २५ लाख मनी म्युल खाती बँक आणि विविध वित्तीय संस्थांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. या माध्यमातून जवळपास ८ हजार कोटी रुपयांची फसवणूक रोखल्या गेल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
खरं म्हणजे मनी म्युल हा केवळ आर्थिक गुन्हा नाही तर संपूर्ण सायबर गुन्हेगारीची साखळी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले खाते वापरू देते, तेव्हा ती नकळतपणे फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि संघटित सायबर गुन्हेगारीला मदत करीत असते. त्यामुळे या समस्येकडे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. शासन, बँका, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, पोलिस यंत्रणा आणि सायबर सुरक्षेचे ज्ञान असणारे नागरिक यांनी संयुक्तपणे जनजागृती केली तरच या वाढत्या धोक्याला आळा घालता येईल. आपले वैयक्तिक बँक खाते ही केवळ आर्थिक सुविधा नसून ती आपली कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव जागृती होणे देखील महत्त्वाचे म्हणावे लागेल. आज काही हजार रुपयांच्या मोहापायी आपले खाते दुसऱ्याला वापरू देणारी व्यक्ती उद्या मोठ्या गुन्हेगारी साखळीत अडकू शकते. त्यामुळे ‘सहज पैसे कमवा’ या आमिषाला बळी पडण्याऐवजी सजग नागरिक म्हणून आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगणे हीच काळाची गरज आहे.
 
९४२२८६२४८४