नागपूर,
NEET student allotted Abu Dhabi exam centre नीट २०२६ पुनर्परीक्षेआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेसाठी थेट अबू धाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीमुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत. अशातच नागपूरमधील अब्दुल्ला या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रात मोठी चूक आढळली. मूळ परीक्षेसाठी नागपूरमध्ये केंद्र असलेल्या या विद्यार्थ्याला फेरपरीक्षेसाठी संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे केंद्र देण्यात आले.

विद्यार्थ्याचे वडील डॉ. मोहम्मद तालिब यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, प्रवेशपत्र डाउनलोड करताना केंद्र अबू धाबी दाखवल्याने कुटुंबीय हादरले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याने केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा या स्थानांची निवड केली होती. तरीही परदेशातील केंद्र कसे देण्यात आले, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अधिकाऱ्यांना ईमेलही पाठवण्यात आला आहे.एनटीए कडून केंद्र बदलण्याचे आश्वासन देण्यात आले असून, लवकरच दुरुस्ती होईल असे सांगण्यात आले आहे. अब्दुल्लाकडे सध्या पासपोर्टही नसल्याने, जर केंद्र बदलले गेले नाही तर तो परीक्षेला बसू शकणार नाही. त्यामुळे त्याचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे एनटीएच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर त्रुटींबाबत संताप व्यक्त केला जात आहे.