ब्रह्मोसच्या नेतृत्वाशी उद्योग क्षेत्राची बैठक
नागपूर,
'Non-Destructive Testing' औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुरक्षा, विश्वासार्हता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग' पद्धतींचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयतीर्थ जोशी यांनी केले.
प्रमुख औद्योगिक संस्थांचा सहभाग
'द इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने उद्योगांशी संवाद साधणारे आणि नागपूर शाखेचे अध्यक्ष जीवन घिमे आणि पराग पाठक यांच्यासह बेक्वेरेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नेको इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा ग्रुप, एस्सार, ब्रह्मोस, जयस्वाल ग्रुप आणि इतर अनेक प्रमुख औद्योगिक संस्थांनी सहभाग घेतला.
'नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग'च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकताना डॉ. जयतीर्थ जोशी पुढे म्हणाले, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संस्था यांच्यात अधिक मजबूत भागीदारी निर्माण करण्याची नितांत गरज आहे. उद्योगांसमोरील विविध आव्हान लक्षात घेता अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग शाखांमधील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग' पद्धतींचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याच्या वाढत्या गरजेवर नागपूर शाखेचे अध्यक्ष जीवन घिमे यांनी सविस्तर चर्चा करीत मार्गदर्शन केले.
प्रगत नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग' तंत्रज्ञान, ज्ञान-आदानप्रदान उपक्रम आणि अत्यंत कुशल तांत्रिक मनुष्यबळाचा विकास यांना चालना देण्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेसने 'द इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग' नागपूर शाखेसोबत सक्रिय सहभाग आणि सहकार्य करण्याची तयारी दाखविली. हा कार्यक्रम शाखेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून यातून औद्योगिक विकास आणि तांत्रिक उत्कृष्टता यांना चालना देण्यास वाव मिळेल, असा विश्वास जीवन घिमे यांनी व्यक्त केला.