Nutritious Diet विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या शालेय पोषण आहारात किड लागल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यातील मुरदाडा जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला असताना काही खाद्यपदार्थांची मुदत (एक्सपायरी डेट) संपल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने तातडीने कारवाई करत पोषण आहाराचा साठा सील केला असून तपासणीसाठी विविध नमुने जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरदाडा येथील पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या मध्यान्ह भोजनाबाबत पालकांनी 5 मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. मुदत संपलेल्या खाद्यसाहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. मात्र, संबंधित तक्रारीवर समाधानकारक कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत पालकांनी थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यालयात ऑनलाइन तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच अवघ्या 24 तासांत एफडीएचे पथक शाळेत दाखल झाले. पथकाने पोषण आहाराची तपासणी करून साठा सील केला तसेच विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीदरम्यान काही खाद्यसाहित्याची मुदत संपल्याचे तसेच धान्यामध्ये किड आढळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान,एफडीएच्या तपासणीत पोषण आहारातील काही साहित्याची मुदत संपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित साठा तातडीने नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळेच्या कर्मचार्यांनी सदर पोषण आहार जमिनीत पुरून नष्ट केल्याची माहिती आहे.
शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह...
या प्रकरणाची तक्रार यापूर्वीच शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, तपासणीत निकृष्ट दर्जाचा व मुदत संपलेला पोषण आहार आढळूनही तत्काळ कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे शिक्षण विभागाच्या तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.