परभणी,
Parbhani temple collapse अचानक कोसळल्याने पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 30 ते 40 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवाडी येथील हनुमान मंदिरात शनिवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. शनिवार हा हनुमान भक्तांसाठी विशेष दिवस असल्याने मंदिर परिसरात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. याच दरम्यान मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला आणि अनेक भाविक त्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन तसेच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, सभामंडप कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.