- कालवधी पूर्ण झाल्यानंतरही पोलिस अधिकारी कायम
अनिल कांबळे
नागपूर,
police transfers राज्य पोलिस दलातील बदल्यांचे वारे सुरुच असले तरी राज्यातील मोजक्याच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अनेक अधिकारी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पोलिस आयुक्त पदांवर ठाण मांडून बसले आहेत. आतापर्यंत राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक (एडीजी) दर्जांच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुर्हूत मिळत नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमधे नाराजीचा सूर आहे.
(संग्रहित छायाचित्र )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही महत्त्वाच्या आयुक्तालयांमध्ये आणि विशेष विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सर्वसाधारणपणे दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदलीची अपेक्षा असते. मात्र, यावर्षी प्रशासनाकडून अप्पर पोलिस महासंचालक स्तरावरील व्यापक फेरबदल न झाल्याने अनेक अधिकारी अद्यापही जुन्याच पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, राज्य पोलिस मुख्यालयातील आस्थापना विभागातील अप्पर पोलिस महासंचालकांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या विभागाचा कारभार अतिरिक्त जबाबदारीवर चालविला जात असून त्यामुळे बदली, पदस्थापना आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, पोलिस दलातील विविध संवर्गांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या टप्प्याटप्प्याने करण्यात आल्या असल्या तरी एडीजी आणि काही पोलिस आयुक्तांच्या बदल्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आगामी काळात राज्य शासनाकडून वरिष्ठ स्तरावरील मोठ्या फेरबदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काही आठवड्यांत रिक्त पदे, निवृत्तीची पार्श्वभूमी आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्णयाला होत असलेल्या विलंबामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य पोलिस दलाच्या कार्यक्षमतेसाठी नियमित आणि वेळेवर होणाऱ्या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे एडीजी स्तरावरील रखडलेल्या बदल्यांकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.
पदोन्नतीचाही निर्णय थंडबस्त्यात
वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय रखडला आहे. १९९४ बॅचच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. पोलिस महासंचालक पदावरुन निवृत्त होण्याचे प्रत्येक अधिकाऱ्यांचे स्वप्न असते. मात्र, पदोन्नतीला विलंब होत असल्यामुळे ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लवकरच पदोन्नतीचा निर्णय होण्याची शक्यता गृहमंत्रालयातील सूत्रांनी वर्तवली आहे.
कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी
ठाणे पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, नाशिक आयुक्तालय, सोलापूर आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय, नागपूर आयुक्तालय आणि पुणे आयुक्तालय येथील ज्येष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व पोलिस अधिकारी नव्या ठिकाणी होणाऱ्या बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.