आरटीओ कर्मचारी संपाचा कोट्यवधींचा फटका

    दिनांक :20-Jun-2026
Total Views |
पाच जिल्ह्यातले वाहन व्यवहार ठप्प
 
 
अमरावती, 
RTO मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाचा फटका आता थेट शासनाच्या महसुलाला बसू लागला आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, खामगाव, वाशीम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील बहुतांश सेवा ठप्प झाल्याने शासनाच्या तिजोरीत दररोज सुमारे ५ कोटी रुपयांचा महसूल जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
 

rto s 
 
कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या राज्यव्यापी बेमुदत संपामुळे वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, लायसन्स नूतनीकरण, परवाना नूतनीकरण, कर भरणा, फिटनेस तपासणी, परमिट नूतनीकरण व मंजुरी तसेच खटला विभागातील महत्त्वाचे इतर व अनेक सेवा प्रभावित झाल्या आहेत. परिणामी वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 
 
परिवहन विभाग हा शासनाच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. दररोज करोडो रुपयांचे व्यवहार आरटीओ कार्यालयांमार्फत होत असतात. मात्र संपामुळे हे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून शासनाच्या महसुलात मोठी घट नोंदविली जात आहे. अमरावती विभागातच दररोज सुमारे ५ कोटी रुपयांचा महसूल अडकत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, आकृतीबंध मंजूर होऊनही सेवा प्रवेश नियम अद्याप लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पदोन्नती, पदभरती आणि इतर प्रशासकीय बाबी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर संपूर्ण राज्यभरात बेमुदत संपाचे पाऊल उचलावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
 
 
दरम्यान, संपाचा कालावधी वाढल्यास केवळ महसुली नुकसानच नव्हे तर वाहन व्यवहारांची राज्यात मोठी प्रलंबितता निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटना तसेच वाहनधारकांकडून होत आहे.
 
 
महसुलाचे दररोज कोट्यवधींचे नुकसान होत असताना शासनाने अद्यापही ठोस भूमिका घेतलेली नाही. हा संप जितका लांबेल तितका फटका शासन आणि सामान्य नागरिकांना बसणार आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटने राज्य उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल मानकर, संदीप खवले, अभिजीत गावंडे, अक्षय राठोड, अमोल माटोडे,संजय चौधरी, मनोज खोब्रागडे, देवेंद्र कळमकर, जयसिंग राठोड, अरुण वाघमारे, पराग जाधव, प्रीती डोंगरे, यशवंत रामटेके, अनिल मेश्राम आदी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.