कोल्हापूर,
Shah's statement in maharashtra गृहमंत्र अमित शाह हे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावार आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे वक्तव्य करत वातावरण तापवले. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता राज्यात एकच शिवसेना अस्तित्वात आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात अमित शाह यांनी विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान बोलताना शाह यांनी शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाच खरी शिवसेना असल्याचे सूचित केले.
या कार्यक्रमाआधी अमित शाह यांनी महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरातील विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. परिक्रमा मार्ग, मंदिर संवर्धन आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली असून, हा प्रकल्प कोल्हापूरच्या धार्मिक आणि पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही खासदारांच्या संभाव्य भूमिकेमुळे राजकीय तणाव वाढल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आगामी काळात या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपल्या भाषणात अमित शाह यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विरोधी आघाडीवर टीका करत केंद्र सरकारच्या विकासकामांचा उल्लेख केला. मंदिर विकास, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारने मोठी कामगिरी केल्याचा दावा त्यांनी केला. या दौऱ्यातील शाह यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांच्या विधानाचे राजकीय पडसाद पुढील काही दिवसांत अधिक स्पष्टपणे दिसण्याची शक्यता आहे.