मुंबई
Shekhar Suman बॉलिवूड अभिनेते आणि दूरचित्रवाणी विश्वातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व शेखर सुमन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेदनादायी काळाविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर झालेल्या मानसिक वेदना आजही कमी झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेखर सुमन यांचा मोठा मुलगा आयुष याचे १९९५ मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ या दुर्मिळ आणि गंभीर आजारामुळे निधन झाले होते. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसला होता. मुलाखतीदरम्यान शेखर यांनी त्या काळातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांच्या वडिलांनीच सर्वप्रथम आयुषच्या प्रकृतीबाबत शंका व्यक्त केली होती.
“माझे वडील डॉक्टर होते. एकदा ते आयुषला मांडीवर घेऊन बसले होते. त्यावेळी त्यांनी मला मुंबईला गेल्यावर त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याचा सल्ला दिला. त्याचा लिव्हर काहीसा मोठा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते,” असे शेखर सुमन यांनी सांगितले.
वडिलांच्या सूचनेनुसार आयुषची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अनेक चाचण्या आणि तपासणीनंतर त्याला ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. हा आजार अत्यंत कमी लोकांमध्ये आढळतो. या आजाराची माहिती वडिलांना फोनवर दिल्यानंतर काही क्षण शांतता पसरली होती. त्यानंतर त्यांच्या तोंडून केवळ “हे देवा!” एवढेच शब्द बाहेर पडल्याचे शेखर यांनी सांगितले.
मुलाच्या निधनानंतरचा काळ आजही विसरता आलेला नसल्याचे सांगताना ते म्हणाले, “माझ्या मुलाला गमावल्याचे दुःख आजही मला सतावत असते. मी याविषयी अनेकदा बोललो आहे, परंतु त्या वेदनेतून मी कधीच पूर्णपणे बाहेर पडू शकणार नाही. आमच्या घरात आजही आयुषचा उल्लेख होतो. आम्ही त्याचे फोटो पाहतो आणि त्याच्या आठवणींमध्ये रमतो.”
यावेळी शेखर सुमन यांनी Shekhar Suman आपल्या आध्यात्मिक श्रद्धांबाबतही भाष्य केले. अनेक पुजारी आणि ज्योतिषांनी आयुष पुन्हा कुटुंबात परत येईल, असे भाकीत केल्याचा दावा त्यांनी केला. “आम्हाला नेहमीच वाटते की आयुष आमच्यासोबत आहे. अनेकांनी असे सांगितले आहे की तो एक दिवस दुसऱ्या रूपात आमच्या कुटुंबात परत येईल. काहींनी तर तो माझा मुलगा अध्ययन सुमनच्या मुलाच्या रूपात जन्म घेईल, असेही सांगितले आहे. आम्ही त्या क्षणाची वाट पाहत आहोत,” असे त्यांनी म्हटले.“मला मनापासून वाटते की तो आजही आमच्या आसपासच आहे. अनेकदा मला त्याचा आवाजही ऐकू आल्यासारखे वाटते,” असे भावनिक उद्गार शेखर सुमन यांनी काढले.शेखर सुमन यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि मुलावरील अपार प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. मुलाच्या निधनानंतर तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्या दुःखाची जखम आजही ताजी असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवले.